श्री दत्तावधूत क्षेत्र निखरे - राजापूर मठातील
उत्सव
गुरुपौर्णिमा उत्सव
श्री स्वामी समर्थ मठामध्ये गुरूपौर्णिमा उत्सवाची सुरुवात सदगुरु श्री रामचंद्र महाराजांनी केली. या दिवशी श्रींची पाद्यपूजा केली जाते. अनेक शिष्य मठात येऊन सदगुरु श्री रामचंद्र महाराज व स्वामींच्या चरणी अभिषेक करतात. दुपारी महानैवेद्य होतो. भजन, आरती, श्री स्वामींकडून शिष्यांना बोधामृत आणि नामस्मरणासह हा कार्यक्रम पार पडतो.
श्री दत्तजन्मोत्सव
श्री स्वामी समर्थ मठात दत्तजन्मोत्सव खूप हर्षोल्लासात साजरा केला जातो. पहाटेच्या काकड आरतीने सुरुवात होते. महादत्ताभिषेक, दत्त याग झाल्यावर महाराजांची उत्सव मूर्ती, साडेतीन शक्तिपीठाचे मुखवटे व सदगुरु महाराजांच्या पादुका पालखीमध्ये सुंदर सजावटीने बसविले जातात. सदगुरु महाराजांच्या समाधी मंदिराला ढोलताशांच्या गजरात पालखी प्रदक्षिणा होते व तिथून थेट सीमा उल्लंघन करून दुपारच्या आरतीला पालखी वाजत गाजत नाचवत मठात परत येते. मध्यान्ह आरती झाल्यावर महाप्रसादाचा कार्यक्रम चालू होतो. संध्याकाळी चार वाजता पुन्हा मठाभोवती पालखी प्रदक्षिणा होते. संध्याकाळी सात वाजता श्री दत्त जन्मोत्सव साजरा केला जातो. रात्री सुमधूर संगीतमयी भजने गायली जातात. मध्यरात्री महाआरती करून कार्यक्रमाची सांगता होते.
श्री मनृसिंहसरस्वती जयंती
सदगुरु श्री रामचंद्र महाराज हा उत्सव अगदी आत्मीयतेने तन्मयतेने करत असत. पहाटेची काकड आरती, पूजा, महाअभिषेक, दत्तयाग केला जातो. सहस्त्रनामाने महाराजांचे आवाहन केले जाते. सदगुरु महाराजांच्या समाधीवर अभिषेक केला जातो. मध्यान्ह आरती करून सर्व भक्तांना महाप्रसाद दिला जातो. संध्याकाळी भजने, आरती केली जाते. अशापद्धतीने हा उत्सव साजरा केला जातो.
श्री स्वामी समर्थ प्रकट दिन
श्री स्वामी समर्थ मठामध्ये या उत्सवाला अनेक ठिकाणांवरून भाविक भक्त येत असतात. त्यादिवशी महाराजांच्या अस्तित्वाची खुण भाविकांना येत असते. महादत्ताभिषेक व दत्तयाग झाल्यावर महाराजांना साडेतीन शक्तीपीठासमवेत पालखीत बसविले जाते आणि पालखी महाराजांच्या समाधी मंदिराला प्रदक्षिणेला मोठ्या दिमाखात निघते. पालखी सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. सर्व भक्त जातीभेद विसरून महाराजांची पालखी आपल्या खांद्यावर घेऊन देहभान विसरून नाचवतात. आपल्या सदगुरुला अंगाखांद्यावर नाचवून धन्य होतात. दुपारची आरती, महाप्रसाद होतो. संध्याकाळी पुन्हा पालखी बाहेर पडते व मठाला प्रदक्षिणा घातली जाते. रात्री भजनांनी वातावरण मंगलमय होऊन जाते. दुसऱ्या दिवशी या कार्यक्रमाची सांगता होते.
सदगुरु श्री रामचंद्र महाराज समाधी उत्सव
सदगुरु श्री रामचंद्र महाराज यांनी वसंत पंचमी दिनांक १५ फेब्रुवारी २०१३ रोजी पहाटे ७.०० च्या दरम्याने जलसमाधी घेऊन आपले अवतार कार्य संपवले. मात्र त्यांचे अस्तित्व सर्व भक्तांना जाणवते. तिथीप्रमाणे महानिर्वाण उत्सव साजरा केला जातो. समाधीवर महाभिषेक केला जातो. तसे त्यांचा सुगंध नेहमीच दरवळत असतो. मात्र त्यादिवशी खूप मोठ्या प्रमाणात दरवळत असतो. पालखी प्रदक्षिणा होते. अनेक भक्त त्यांच्या सहवासातील आठवणी, शिकवण एकमेकांना सांगत आठवणींना उजाळा देतात. मध्यान्ह आरती, महाप्रसाद होतो. रात्री भजने, आरती होतात. दुसऱ्या दिवशी सर्व भक्त रखवालीचे नारळ ठेवतात व मग कार्यक्रमाची सांगता होते.
श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी
श्री स्वामी समर्थ मठात श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी कार्यक्रम अगदी साध्यापद्धतीने साजरा केला जातो. सकाळी काकड आरती झाल्यावर, पूजा केली जाते. त्यानंतर उत्सव मूर्तीवर महादत्ताभिषेक केला जातो, १००८ नामाने पुष्पांजली वाहिली जाते. त्यानंतर महायाग केला जातो. अनेक भक्त यात सहभाग घेतात. मध्यान्ह आरती झाल्यावर महाप्रसादाचा कार्यक्रम होतो. संध्याकाळी सदगुरु श्री रामचंद्र महाराज रचित भजने गायली जातात. रात्री महाप्रसाद होतो. मध्यरात्री महाआरती केली जाते व कार्यक्रमाची सांगता होते.
सदगुरु पालखी सोहळा
सदगुरु माऊलींचे व त्यांच्या येणाऱ्या भक्तांचे छळ स्थानिक लोकांनी केले. पिण्याच्या पाण्यापासून ते पायवाटाही बंद केल्या. महाराजांना त्यांच्या परिवाराला भावकीतून गावातून बहिष्कृत करून वहाळीत टाकले. तेव्हा श्री स्वामींनी आपल्या भक्तांना होणारा त्रास पाहून पादुका स्थापना केल्या. १) गिरीश मर्तल, गाव कसाल ता. कुडाळ, २) धोंडू पुनाजी लांजवळ, गाव फणसगाव ता. देवगड, ३) दिगंबर घेवडे, गाव गुंजवणे ता. राजापूर यांच्या घरी पादुका स्थापना करून अनेक भक्तांना अभयवचन दिले. दरवर्षी मे महिन्यात मठातून मोठ्या दिमाखात वाजत गाजत भगवे झेंडे बहरत हजारो भक्तांच्या भेटीला स्वामी माऊलींची पालखी या स्थानांना भेट देते. अनेक भक्तांच्या विनंतीवर त्यांच्या गावोगावी पालखी भेट होत असते. हा कार्यक्रम दोन दिवस चालतो. पहाटे पालखी मठातून निघते व दुसऱ्या दिवशी सायंकाळी मठाला प्रदक्षिणा करून मठात विसावते. यानंतर पालखी थेट दत्तजयंतीलाच बाहेर पडते.