सदगुरु श्री स्वामी माऊलींनी श्री दत्तावधूत पादुकांची स्थापना केली. या पादुका विशेष कृष्ण शिळेमध्ये कोरल्या गेल्या. विश्वातील श्री दत्तगुरूंच्या या प्रथम पादुका आहेत ज्या शिवलिंगाच्या रूपात आहेत. हे शिवलिंग बावन्न कमळाच्या दलात असून. प्रत्येक दलावर बीज मंत्र कोरलेले आहेत. बावन्न बीजमंत्र या कमळदलावर कोरलेले आहेत. शिवलिंगाच्या मध्यभागी श्री दत्तमहाराजांच्या नऊ इंचाच्या खडावा कोरलेल्या आहेत. त्या खडावांवर सुदर्शन, शंख कोरलेले आहेत. या पादुकांची रचना सदगुरु माऊलींनी विशेष पद्धतीने केली आहे. श्री दत्तावधूत पादुकांवर महादत्ताभिषेक केले जातात. त्यातून त्रिविध ताप, कालसर्प दोष, पितृ दोष, सर्वप्रकारचे दोष, सर्व प्रकारचे शाप, भोग, दुःख, दारिद्र्य, क्लेश, पिडा, जारण मारण उच्चाटनासारखे प्रयोग, ग्रह पिडा, ब्रह्मराक्षस दोष, वास्तू दोष असे अनेक प्रकारच्या त्रासातून मुक्तता होते. जे भक्त महादत्ताभिषेक करतात त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. सदगुरु श्री स्वामी माऊलींनी या पादुकांवर श्रद्धेने भक्तीने जे महादत्ताभिषेक करतील त्यांना श्री दत्तगुरूंचे आशीर्वचन कवच लाभेल असे वचन दिले असून त्याचा प्रत्यय हजारो भक्तांना येत आहे. श्री दत्तावधूत पादुकांच्या दर्शन घेऊन लाखो भक्त धन्य झालेत, त्यांना श्री दत्तगुरुंचा प्रत्यय येतो.
सदगुरु श्री स्वामी माऊलींच्या मार्गदर्शनात श्री दत्तमहाराज व त्यांच्या पत्नी अनघा देवी यांची मूर्ती विशेष अशा कृष्ण शिळेमध्ये बनविण्यात येत आहे. हे पाषाण महाराजांसाठी नर उग्र स्वरूपाचे पाषाण आहे तर आई अनघा देवींसाठी शीतल मादी स्वरूपाचे आहे. अनेक महिन्यांच्या अथक परिश्रमाने ही पाशाने मिळाली. शिलापूजन प्रत्यक्ष सदगुरु श्री स्वामी माऊलींनी केले आहे. श्री दत्त महाराज हे एक मुखी असून, द्विभुज उभी मूर्ती आहे. डाव्या हातात त्रिशूळ धारण केलेले आहे. तर उजव्या हाताने आशिष देत आहेत. सोबत श्री दत्त महाराजांच्या पत्नी अनघा देवी या पद्मावती लक्ष्मीच्या रूपात आहेत. त्या दत्त महाराजांप्रमाणे योगिनी तपस्विनी स्वरूपात आहेत. श्री अनघादत्त गुरूंच्या दर्शनाने सर्व भक्त संतोष पावतील अशी ही मंत्रमुग्ध करणारी मूर्ती विशेष पद्धतीने रचनात्मक असणार आहे. ज्यावर अनेक चिन्हे कोरलेली असतील ती श्री दत्तमहाराजांच्या इतिहासाला अजून जागृत करून श्री दत्त गुरूंच्या भक्तीचा प्रचारप्रसार वाढण्यास मदत होईल. मूर्तिनिर्माणाचे काम अंतिम टप्प्यावर असून लवकरच प्राणप्रतिष्ठापणा होऊन भक्तार्पण केले जाईल.
सदगुरु श्री रामचंद्र योगी महाराज यांनी १५ फेब्रुवारी २०१३ रोजी दिड पुरुष खोल पाण्यामध्ये पद्मस्त बसून जिवंत समाधी घेतली. त्यांची मठाच्या शेजारी भूगर्भ समाधी बांधण्यात आली. हे मंदिर जिर्णोद्धार करण्यात येणार आहे. या मंदिराच्या बांधकामासाठी कृष्णशिळेचा वापर करण्यात येणार आहे. या मंदिराची रचना शिवलिंगाच्या स्वरूपात असणार आहे. इतिहासातले हे अनोखे मंदिर असणार आहे. जे शिवलिंगाच्या दहा फूट जमिनीच्या आत अंतर्भागात महाराजांची समाधी असून पादुकांच्या ठिकाणी साक्षात शेषशायी महाविष्णू असणार आहेत. समाधीच्या मागच्या बाजूला श्री मनृसिंहसरस्वती महाराज, डाव्या बाजूला साक्षात श्री स्वामी समर्थ तर उजव्या बाजूला श्री श्रीपाद श्रीवल्लभ असणार आहेत. मुख्य दरवाजावर नंदी व भृंगी ऋषी द्वारपालाच्या रूपात असणार आहेत. हे मंदिर विशाल शिळांमध्ये विशिष्ट खाचांमध्ये प्राचीन पद्धतीने बनविले जाणार आहे. या मंदिरात प्रवेश करणाऱ्या भक्तांना प्रचंड चैतन्यमयी शक्तीचा प्रत्यय येणार आहे, अशा पद्धतीने विशेष रचना सदगुरु श्री स्वामी माऊलींनी केली आहे.
भक्तांची सेवा हिच ईश्वराची सेवा आहे ही शिकवण देत सदगुरु श्री स्वामी माऊलींनी भक्तांना, साधकांना रहाण्यासाठी भक्तनिवास बांधण्याचे काम हाती घेतले आहे. सध्या दहा खोल्या बांधून पूर्ण आहेत. अजून दहा खोल्यांचे काम चालू आहे. श्री दत्तावधूत क्षेत्र निखरे हे अतिशय दुर्गम भागात आहे. इथे येणाऱ्या भक्तांना रहाण्याची गैरसोय होत होती, त्यामुळे माऊलींनी प्रथम पायरीवर छोट्याशा भक्तनिवासाच्या निर्माणाचे कार्य हाती घेतले आहे. भविष्यात हजारो भक्तांना रहाता यावे म्हणून तसे नियोजन देखील आहे. येणाऱ्या भक्तांना रहाण्याची सोय, चहा, नाश्ता, दुपारी रात्री प्रसाद मोफत देण्यात येणार आहे. तसे व्यवस्थापन श्री दत्तावधूत मठातर्फे केले जात आहे.
श्री दत्तावधूत क्षेत्र निखरे – राजापूर येथे सदगुरु श्री स्वामी माऊलींच्या आशीर्वादाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉस्पिटल बांधण्यात येणार आहे. हे हॉस्पिटल अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असणार आहे. इथे कुशल अनुभवी डॉक्टर्स व स्टाफ असणार आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे या ठिकाणी येणाऱ्या गरिबातील गरीब व श्रीमंतातील श्रीमंत व्यक्तींनाही कोणताही भेद न करता फक्त एक रुपयात औषधोपचार, शल्य चिकित्सा, शस्त्रक्रिया या सेवा मिळणार आहेत. रुग्णासोबत एक व्यक्तीची रहाण्याची, जेवणाची सोय देखील मोफत असणार आहे. किमान पाच हजार बेडची व्यवस्था असणारे सर्व आजारांवर उपचार केले जाणारे हॉस्पिटल निर्माणाचे नियोजन आहे.
अत्याधुनिक शिक्षणाबरोबर आपले प्राचीन वेदाचे ज्ञान प्रत्येक घराघरात पोचवण्यासाठी सदगुरु श्री स्वामी माऊली यांनी वेदशाळा, शाळा, महाविद्यालय निर्माणाचे नियोजन केले आहे. यामध्ये सर्व मुलांना लहानपणापासून वेदाचे ज्ञान देऊन अत्याधुनिक शिक्षण देखील दिले जाणार आहे. हे शिक्षण गावोगावी पोचवण्यासाठी श्री दत्तावधूत मठातर्फे गावोगावी या शाळांची निर्मिती केली जाणार आहे. शिकणाऱ्या मुलांची शिक्षणाची, निवासाची, जेवणाची व्यवस्था मोफत असणार आहे. इथे उत्तम विध्यार्थी घडवून समाजाचे व देशाचे हित साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विद्यार्थ्यांची इच्छा व पात्रता असून पालकांची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे असे सर्व विद्यार्थी शिक्षण घेऊ शकत नाहीत. अशा सर्व विध्यार्थ्यांना येथे प्रवेश अगदी सहज मिळू शकणार आहे. सर्व क्षेत्रातील उच्च व माध्यमिक महाविद्यालये येथे असणार आहेत.
सदगुरु श्री स्वामी माऊलीं सांगतात आपली प्राचीन संस्कृती ही मंदिरांमुळे, ग्रंथांमुळे टिकून आहे. त्यात एक पाऊल म्हणून माऊलींनी श्री दत्त मंदिराच्या निर्माणाचे कार्य हाती घेतले आहे. सदगुरु समाधी मंदिर निर्माणानंतर श्री दत्तावधूत मंदिराची निर्मिती केली जाणार आहे. प्राचीन शैलीत काळ्या पाषाणात हे मंदिर बनवले जाणार आहे. या मंदिराची वैशिष्ट्य अनेक असणार आहेत. हे मंदिर शिवपीठ, विष्णूपीठ, ब्रह्मपीठ, शक्तीपीठ व गुरुपीठाचे संमिश्र असे उत्तम कला दर्शवणारे असणार आहे. संपूर्ण विश्वातले हे दुर्मिळ कलेचे एकमेव मंदिर असणार आहे जिथे हा उत्तम मिश्रित संयोग असणार आहे. श्री दत्त महाराजांचे सर्व अवतार, विष्णू लक्ष्मीचे सर्व अवतार, शिव पार्वतीचे सर्व अवतार, ब्रह्म सरस्वतीचे सर्व अवतार या मंदिराच्या बाह्य भागावर कोरले जाणार आहेत. या मंदिराच्या कामात कोणत्याही धातूचा, सिमेंटचा वापर करण्यात येणार नाही. हे मंदिर किमान पाच हजार वर्ष टिकणारे बनवण्यात येणार आहे. भक्तांना आपली संस्कृती, परंपरा याचे दर्शन देणारे हे अद्वितीय मंदिर असणार आहे.
जे का रंजले गांजले l त्यांसी म्हणे जो आपुले l तोची साधू ओळखावा l देव तेथेची जाणावा l