ii हरि ॐ तत्सद ii

सदगुरु श्री शरदचंद्र स्वामी महाराज

जीवनगाथा

सदगुरु श्री शरदचंद्र स्वामी महाराज यांचा अध्यात्मिक खडतर दत्त प्रवास !

जन्मतारीख दि. 25.10.1931 (अश्विन शुद्ध चतुर्दशी )

महानिर्वाण दि. 12.12.2016 (शुक्लपक्ष चतुर्दशी )

                शिरगावातून शरदचंद्र स्वामींचा सुगंध सर्वत्र पसरु लागला. परंतु कोणताही भपका अंगी नसल्याने ते ईश्वर चिंतनात मग्न रहाणे, सर्व थरातील लोकांशी गप्पा मारताना त्यांना आध्यात्मिक अनुभूती देणे याच कार्यात मग्न राहिले. तरीही श्रीवर्धन, खारेपाटण, मुंबई, चिपळूण, मार्गताम्हाणे या व अनेक ठिकाणी असलेले त्यांचे अनुयायी व शिष्य स्वामींच्या दर्शनाला व भेटीला येत असत. स्वामींकडे आपले कौटुंबिक व विविध प्रकारचे प्रश्न सोडविण्यासाठी श्रद्धेने लोक येत. स्वामी त्यांना अचूक मार्गदर्शन करत. खूण म्हणून ते विभूती देत. अनेकांना मार्ग सुधारुन देवून त्यांच्या कुटुंबाचे त्यांनी भले केले आहे. त्यांनी कोणाकडून कधी काही मागितले नाही. रत्नप्रभा सिताराम शेट्ये ह्या खारेपाटण येथून येवून स्वामींना भेटल्या. त्यांनी आपले काही प्रश्न स्वामींना विचारले. स्वामींनी दिलेली उत्तरे त्यांना तंतोतंत पटली व मोठय़ा भाविकतेने स्वामींना त्यांनी दत्त महाराजांची मूर्ती भेट दिली. या मूर्तीची 3 जून 1971 रोजी स्वामींनी स्वहस्ते प्रतिष्ठापना केली.

                   स्वामींना सिद्धी प्राप्त झाली होती. ते दर गुरुवारी उपोषण करत असत. श्रावणाच्या पहिल्या गुरुवारपासून स्वामी 21 दिवसांचे मौनव्रत पाळत असत. मुंबईत असताना 1959 पासूनच हे मौनव्रत पाळत. हे मौनव्रत तेथे 7 दिवसांचे असे. रत्नागिरी – शिरगावात आल्यावर ते त्यांनी 21 दिवस पाळणे सुरु केले. 22 व्या दिवशी मौनव्रताचा सांगता उत्सव साजरा केला जात असे. या समाप्तीला येणाऱ्या सर्वांना महाप्रसाद घेतल्याशिवाय जावू न देण्यावर ते स्वतः कटाक्ष ठेवून असत. तसेच दत्तजयंती, श्री नृसिंह सरस्वती जयंती (पौष शुद्ध द्वितीया) व गुरूपौर्णिमा हेही उत्सव मोठ्या आनंदाने साजरे होत असत. स्वामींना तीन पुत्र आहेत. संतसाधुत्वाचा कोणताही डामडौल नसलेली भगव्या वस्त्रातील शरदचंद्रस्वामींची आकृती केव्हाही सामान्य माणसाप्रमाणे रस्त्यातून चालताना दिसे. त्यांची सतत वदनमूर्ती बघणा-या व्यक्तीच्या मनातही उत्साह व आनंद निर्माण करे. रोज त्यांच्याकडे सकाळी 6.00 आणि सायंकाळी अशी दोन वेळा आरती होत असे व दुपारी 11.30 वाजता नैवेद्याचा गजर केला जात असे. असा दिनक्रम असे.

                कोणताही स्वार्थ बाळगून न केल्याने सतत दुसर्‍याच्या कल्याणाचा विचार केल्याने ते सदानकदा प्रसन्नचित असत. सत्य हीच श्रद्धा हा त्यांचा संदेश आहे. कशानेही विचलित न होता ईश्वरावर आपला भार सोपवावा, दुःखी राहू नये असा विचार करतानाच शरदचंद्रस्वामी म्हणतात की, टीका कोणाला चुकत नाही, लोकांनी टीका केली तर काळजी करू नका. मात्र ती टीका त्यांनी का केली असेल, यावर अंतर्मुख होऊन त्याचा विचार प्रत्येकाने करणे जरुरीचे आहे, असे ते वारंवार सांगत. मूर्तीमध्ये ईश्वर नसून तो प्रत्येक मनुष्याच्या अंतःकरणात आहे. पदस्पर्श करण्यापेक्षा नामस्मरण करा. घसरलेला पाय एकवेळ सावरता येतो. परंतु तोंडातून गेलेला शब्द सावरता येत नाही. भक्ती हीच मोक्षाची साधना. अशा प्रकारे त्यांच्याकडे येणाऱ्या भाविकांना त्यांची शिकवण असे.
वयाच्या 85 व्या वर्षी 12 डिसेंबर 2016 रोजी मार्गशीर्ष शुक्लपक्ष चतुर्दशी या दिवशी त्यांनी महानिर्वाण होऊन दत्तमय झाले.

  • संपर्क : श्री. राजेश शरदचंद्र शेट्ये
  • पत्ता
  • 512 (क) शिरगांव शेट्येवाडी जि.रत्नागिरी
  • मोबाईल क्र.
  • 989 026 1940