ii ॐ ॐकारा गुरुदेव दत्त ii
सदगुरु श्री रामचंद्र योगी महाराज
जीवनगाथा
सदगुरु श्री रामचंद्र योगी महाराज यांच्या जीवनावर थोडक्यात आत्मानुभव
सदगुरु श्री रामचंद्र नारायण नकाशे हे दत्त सांप्रदायातील इ. स. २० व्या शतकातील एक महान सदगुरु होऊन गेले. त्यांचा जन्म दिनांक २५ जुलै १९४५ रोजी गुरुपौर्णिमेच्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील निखरे या गावी झाला. तेथूनच त्यांनी गुरुपरंपरेची भव्य पताका रोवली. त्यांना लहानपणापासूनच गीता, दत्तस्तोत्रे मुखोद्गत होती. त्यांनी स्वतःच्या जीवनातील काही वर्षे देशसेवेसाठी मिलिटरीत राहून दिली. त्यांनी जवळपास ६००० पेक्षा जास्त भक्तिगीते, कित्येक अभंग, शरीरशास्त्र या विषयावरील खूप सारी महत्वपूर्ण माहिती लिहून ठेवली आहे. तसेच आत्मानुभव या महान ग्रंथाचे लिखाण त्यांनी केले आहे. या ग्रंथात त्यांनी त्यांचे स्वतःचे जीवनचरित्र लिहून ठेवले आहे. अशा या थोर विभूतीने पूर्ण आयुष्य साधेपणाने जगून अध्यात्माचा प्रसार करत दि. १५ फेब्रुवारी २०१३ रोजी वसंत पंचमीच्या दिवशी जलसमाधी घेऊन आपल्या कार्याची सांगता केली.
सदगुरु श्री रामचंद्र महाराज यांचे वडील श्री. नारायण शेठ आणि त्यांच्या आई भागीरथी बाई हे एक उत्तम शेतकरी कुटुंब होते. तसेच ते एक छोटे पण निष्णात व्यापारी होते. व्यापाराच्या निमित्ताने त्यांना ठिकठिकाणी फिरावे लागत असे. त्यांचे घर धनधान्याने समृद्ध होते. एक दिवस त्यांचा मोती बैल आजारी पडला. अनेक औषधोपचार केले. मात्र काही केल्या तो बरा होईना. ते व्यापारानिमित्त सर्वत्र फिरत असल्यामुळे कित्येकजणांनी त्यांना वेगवेगळे उपाय सुचविले. पण तो काही बरा होईना. खरेतर ही त्यांची एक प्रकारे परीक्षाच होती. पण हीच होती दत्तसांप्रदायाच्या इतिहासाची सुरुवात.
कोणीतरी श्री. नारायण यांना सुचविले की, पांगरे गावांत टेंबे नावाचे ब्राह्मण आहेत, ते औषध देतात. एके दिवशी ते पहाटे चार वाजता त्यांच्याकडे औषध आणायला गेले. पुढचा दरवाजा ठोठावला. परंतु आतून कोणाचाच प्रतिसाद येईना. आतून गुणगुणण्याचा आवाज येत होता. श्री. नारायण हे मागच्या बाजूच्या दरवाजाकडे गेले. त्यांनी तो दरवाजा ठोठावला, तर तो आपोआप उघडला गेला. ते हळूहळू कुणी आहे का, हे विचारत पुढे गेले. पाहतात तर काय, एक भला मोठा वानर. ज्याची काया, केस चमकत होते आणि तो ग्रंथाचे पारायण करत होता. श्री. नारायण हे भितीने आणि आश्चर्याचा धक्का लागून थरथर कापत होते. थोड्याच वेळात तो भला मोठा वानर म्हणजे मारुती राया आपल्या मूळ स्वरुपात आला होता. तेच होते सदगुरु श्री शिवानंद टेंबे स्वामी. ज्यांना सदगुरु श्री वासुदेवानंद टेंबे स्वामी आणि त्यांच्याच आदेशाने त्यांना लाभलेले दुसरे सदगुरु श्री सिद्धारुढ स्वामी. असे हे सदगुरु श्री शिवानंद स्वामी म्हणजेच साक्षात हनुमंत, श्री. नारायणांकडे पहात स्मित हास्य करीत हे कुणाला सांगू नकोस, असे सांगून त्यांना काही औषधी दिली आणि पाठवून दिले. मोती बैल त्याच दिवशी बरा झाला. तेव्हापासून श्री. नारायण नित्यनियमाने सदगुरु भेटीला जाऊ लागले.सदगुरु
एक दिवस त्यांना जवळ बोलावून घेत सदगुरु श्री शिवानंद स्वामीनी सांगितले. तुझ्यापोटी महान अधिकारी पुरुषाचा जन्म होणार आहे. जिथून दत्तपरंपरेचा महान मार्ग चालणार आहे. त्या अधिकारी पुरुषाच्या पोटी महान अवताराचे कार्य होणार आहे. तू गुरुचरित्राची पारायणे कर. कोणतेही नियम नाहीत. एकच नियम, श्रद्धेने पारायणे कर. सदगुरु शिवानंद स्वामींच्या आदेशाने श्री गुरुचरित्राची पारायणे नित्यनियमाने श्री.नारायण करु लागले. ते रात्रीचे शेतात मशालीच्या किंवा दिवटीच्या प्रकाशात वाचन करत. जंगलात, रानात व्यापार करतांना, जिथे असत तिथे वाचन चालू ठेवत. त्यात खंड पडू दिला नाही. अशातच भागीरथी बाईंना दिवस गेले आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तावेळी एका दिव्य मुलाचा जन्म झाला. त्यांना प्रश्न पडला, याचे नाव काय ठेवायचे? श्री. नारायण यांचे चुलते रामचंद्र योगी होवून गेले होते. ते जंगलातच रहात असत. अनेक श्वापदे ते आपला हात वर करून बोलावत असत आणि तासनतास त्यांच्याशी बोलत असत. त्यांचे अनेक चमत्कार माहित असल्यामुळे, बाळाचे नाव रामचंद्र योगी यांच्याच नावाने रामचंद्र असे ठेवले. अनेक लोक त्यांना बबन सुद्धा म्हणत. लहानपणीच त्यांना गीता, दत्तस्तोत्रे मुखोद्गत होते.
सदगुरु श्री रामचंद्र महाराज लहानाचे मोठे होऊ लागले. श्री. नारायण यांचा व्यवसाय पूर्ण बंद पडला. अठरा विश्व दारिद्रय घरात आले. परंतु शेतीमुळे पोटभर खायला मिळत होते. मात्र कपडा, बाहेरची कोणतीही गोष्ट मिळेना. पैशापैशाची दशा झाली होती. वाडीतल्या बाबल्या नावाच्या मुलाची फाटकी बनियन लंगोटी म्हणून लावून महाराज शाळेत जात. एक दिवस या बाबल्याने त्यांना हिणवले. महाराजांना खूप वाईट वाटले. आपल्या गरिबीची कीव आली. त्यांनी ती लंगोटी काढून त्या मुलाला परत केली आणि गप्प बसले. बाबल्याने पुन्हा त्यांना डिवचले, चिडवू लागला. तो त्यांच्या अंगावर परत येवू लागला. आता शांत असणारे रामचंद्र महाराज यांनी रौद्र रुप धारण केले आणि त्या मुलाला बेदम मारले. शाळेतून जे परत आले ते पुन्हा त्या शाळेत गेलेच नाहीत. संध्याकाळी मोठ्या माणसांची भांडणे झाली, तेव्हा श्री. नारायणांनी महाराजांना विचारले, तू असे का केलेस? महाराजांनी सर्व गोष्टी सांगून शेवटी सांगितले, आला अंगावर घेतला शिंगावर.
सदगुरु श्री रामचंद्र महाराज जास्तीतजास्त वेळ नामस्मरण, भजन यात घालवू लागले. श्री. नारायणांना त्यांच्या शेती कामात हातभार लावू लागले. ते सदगुरु श्री शिवानंद स्वामींच्या दर्शनाला जात असत. सदगुरु श्री शिवानंद स्वामी सदगुरु श्री रामचंद्र महाराजांच्या सदैव पाठीशी उभे राहिले. याचा प्रत्यय नेहमी येऊ लागला. साक्षात हनुमंत अनेक निर्णयात त्यांच्या पाठी उभा राहिला आहे, हे सर्व सदगुरु श्री रामचंद्र महाराज यांनी स्वतः आत्मानुभव या ग्रंथात लिहून ठेवले आहे.
सदगुरु श्री रामचंद्र महाराज कामासाठी म्हणून मुंबईला गेले. एक दिवस पहाटे त्यांना हनुमंताने उठवलं. ” झोपलास काय? कुलाब्याला चल. ” महाराज उठले आणि कुलाब्याला पोहोचले. पाहतात तर तिथे सैन्य भरती चालू होती. महाराज तेथे गेले. त्यांची मिलिटरीत निवड झाली लांसनाईक सुभेदार म्हणून आणि ते देशसेवेला लागले. ते जिथे बदली होवून जात तिथे छोटेसे दत्तमंदिर उभे करत आणि ड्यूटी व्यतिरिक्तचा वेळ साधनेत घालवित असत. त्यांना शोधायचे तर एकच ठिकाण दत्तमंदिर.
या प्रवासात त्यांच्या आई भागीरथी स्वर्गवासी झाल्या आणि वर्षभरातच वडील श्री.नारायण यांनी देह ठेवला. याची जाणीव त्यांना सीमेवर झाली. अचानक महाराजांना चक्कर येवून ते जमिनीवर कोसळले. महाराज यांनी या दुःखातून स्वतःला सावरले. पुढची वाट चालू लागले. त्यांनी लग्न केले. लग्न करुन एक महिन्याने ते पुन्हा मिलिटरीत गेले. इकडे त्यांच्या भावांनी, त्यांच्या बायकांनी महाराजांच्या पत्नीचे (आई सुलोचना) जगणे कठीण केले. खोटे आरोपांची पत्रे लिहीत आणि त्यांच्या पत्नीला ऐकवून ती महाराजांना पाठवीत. याचे कारण होते, महाराजांच्या भावांच्या बायकांची इच्छा होती, त्यांच्या बहिणीशी त्यांचे लग्न व्हावे. त्यांच्या सर्वांच्या मनाविरुद्ध महाराजांनी आई सुलोचना यांच्याशी लग्न केले होते. आई सुलोचना यांनी लहानपणापासून कठोर उपवास केले. अतिगरीबीतून तिने आपल्या भावंडांचे पालन पोषण केले. स्वतःचे शिक्षण सोडून भावंडांना सांभाळले. तिचे भगवंतावर खूप प्रेम, श्रद्धा, विश्वास होता. महाराजांना अनेक खोडसाळ पत्र पाठवून त्यांच्याबद्दल तिरस्कार निर्माण होईल आणि पत्नीला सोडून देतील, म्हणून एकीकडे हा प्रयत्न. तर दुसरीकडे जेवण द्यायचे नाही, मारायचे, हालअपेष्टा जेवढी करता येईल तेवढी करायची, म्हणजे ही घर सोडून जाईल. अशी परिस्थिती निर्माण केली. मात्र आई सुलोचना या ठाम टिकून राहिल्या.
महाराजांची देशसेवा पूर्ण झाली. आता पुढील कार्यासाठी निघा, म्हणून हनुमंत रायांचा आदेश आला. महाराजांनी राजीनामा दिला आणि गावाकडे आले. कुटुंबासह ते रत्नागिरी येथे निघाले. रस्त्यावर चणे शेंगदाणे विकायचे. कधी सरबत, कधी भेळ, कधी भाजी विक, असे करत प्रपंच करु लागले. याच काळात त्यांना पहिली मुलगी सुमन, दुसरा मुलगा सुरेश (दादा), तिसरी मुलगी सुशीला झाली. काही काळ त्यांनी लॉंचवर काम केले. स्टेट बँक येथे सेक्युरिटीचे काम केले. नंतर त्यांना एस.टी.महामंडळात सेक्युरिटीचे काम मिळाले.
याच दरम्यान आई सुलोचना यांची तब्बेत खूपच बिघडली. काही केल्या आराम पडेना. सर्व डॉक्टर झाले. देवही पाहून झाले. जे लोक सांगत ते महाराजांना योग्य वाटेना. अशातच त्यांच्या जोडीदाराने सांगितले, शिरगांवला शरदचंद्र स्वामी आहेत, त्यांच्याकडे जा. महाराज शिरगांवला पोहोचले. तिथे एक छोटे दत्तमंदिर होते. त्या ठिकाणी अनेक लोक बसले होते आणि समोर एक दिव्य व्यक्ती केस पाठीवर सोडून भगवी वस्त्रे घालून बसली होती. त्या गर्दीत महाराज जावून बसले आणि त्या समोरच्या व्यक्तीने हाक मारली. नकाशे तिकडे कुठे बसतोयस, इकडे ये. महाराज जवळ गेले. हात जोडले, नमस्कार केला. तेव्हा त्या व्यक्तीने उभे
राहून पाठीवर हात मारत म्हटले, अरे आपण एकाच परिवारातले, असे म्हणून त्यांनी एक छोटासा उपाय सांगून पाठविले. आई सुलोचना ठणठणीत बऱ्या झाल्या आणि महाराजांची वाट शिरगांवला चालू झाली. ही दिव्य व्यक्ती म्हणजेच सदगुरु श्री शरदचंद्र स्वामी. ज्यांना साक्षात सदगुरु श्री मनृसिंह सरस्वती महाराजांनी दर्शन देवून उद्धरीले होते. काय योगायोग असतो, या न त्या मार्गाने दत्तमहाराज पुन्हा दरवाजात येवून उभे रहात होते. श्री. नारायणांना जे गुरु लाभले ते शिवानंद स्वामी म्हणजे साक्षात हनुमंत, जे सदगुरु श्री रामचंद्र महाराजांच्या पाठीशी सदैव उभे राहिले. त्यांचे गुरु सदगुरु वासुदेवानंद स्वामी. ज्यांच्यावर सदगुरु श्री नृसिंह सरस्वती दत्त महाराजांचा असीम वरद हस्त होता आणि आता सदगुरु श्री शरदचंद्र स्वामींच्या रुपात महाराजांना पुन्हा तोच साक्षात्कार होऊ लागला.
सदगुरु श्री रामचंद्र महाराजांनी शरदचंद्र स्वामींकडे गुरु दीक्षा मागितली. तेव्हा त्यांनी सांगितले, मला आदेश आला तर तुला दीक्षा देईन. मी श्रावणात मौनव्रत ठेवतो, तेव्हा तुझ्यासाठी मी आदेश मागेन. श्रावणात मौनव्रत चालू झाले. शेवटच्या दिवशी महाराज सदगुरु भेटीला गेले. मात्र सदगुरु शरदचंद्र स्वामींनी महाराजांना सांगितले, तुझा अधिकार मोठा आहे. मी तुला गुरु दीक्षा नाही देवू शकत. महाराज निराश झाले. त्यांनी सांगितले, मी तुम्हाला गुरुस्थानी मानले आहे. मी एकलव्याप्रमाणे तुमची भक्ती करेन आणि ते तिथून निघाले. त्यानंतर महाराज त्यांना २१ वर्षानी भेटले.
सदगुरु श्री रामचंद्र महाराजांना विरक्ती आली होती. अनेक वेळा संसार त्यागून घरदार सोडून ते नरसोबाच्या वाडीला जात. मात्र हनुमंत राया कानशिलात मारुन माघारी पाठवत आणि सांगत अजून तुझे कार्य बाकी आहे. महाराजांनी २१ गुरुवारचा संकल्प सोडला. महाराज दर गुरुवारी नरसोबा वाडीला जात. पहिले चार गुरुवार चांगले गेले. नंतर ते आजारी पडले. बुधवारी चांगले होत आणि वाडीला जात. गुरुवारची सेवा दर्शन करुन शुक्रवारी घरी येत आणि पुन्हा अंथरुणावर आडवे पडत. काय आजार आहे ते डॉक्टरांना कळेना. पैसे संपल्यामुळे शेवटी घरातील चहाचा टोप सुद्धा आई सुलोचना यांनी विकला. पण महाराजांच्या तब्येतीत काही सुधारणा होईना. शेवटच्या गुरुवारी नृसिंहवाडीला पोहोचले. त्यांनी दर्शन घेतले. रुद्राक्षाची माळ जपण्यासाठी घेतली आणि मनात विचार आला, माळ तर घेतली पण गुरुमंत्र कोणता जपणार? मनात हे दुःख घेवून ते घरी पोहोचले. आता त्यांचा आजार पळून गेला होता. ती त्यांची कसोटी होती. त्यात ते पास झाले होते. आजार कुठल्या कुठे पळून गेला होता. महाराज पूजा पाठ करुन झोपले. मनात एकच दुःख, गुरुमंत्र कोणता? पहाटे चार वाजता त्यांना दृष्टांत झाला. दिव्य तेजस्वी दत्तात्रेयांनी दर्शन दिले. कशाला चिंता करतोयस. मी तुझा गुरु आहे. llॐ नमो जय गुरुदेव दत्त ll हा तुझा गुरुमंत्र आहे. हा जपत जा. मी तुझ्या सोबतच आहे. महाराज ll ॐ नमो जय गुरुदेव दत्त ll महामंत्र जपत मोठमोठ्याने ओरडत उठून बसले. त्यांच्या डोळ्यातून अश्रूधारा वहात होत्या. आई सुलोचना यांनी विचारले, काय झाले? त्यांनी सांगितले, दत्त महाराजांनी मला दर्शन दिले. मला शिष्य म्हणून स्विकारले. माझ्यावर कृपा झाली. मला गुरुमंत्र मिळाला.
सदगुरु श्री रामचंद्र महाराजांचा महामार्ग चालू झाला. मुखात सतत नामस्मरण, हृदयात भक्तीची वाटचाल चालू झाली. अनेक ग्रंथांचा अभ्यास, अनुभव अशातून त्यांनी आत्मानुभव हे आत्मचरित्र लिहिले. ज्यात त्यांनी अनुभवलेले, जगलेले प्रत्येक क्षण त्यात मांडले आहेत. अनेक अभंग लिहिले. हा प्रवास चालू असतांना त्यांनी बारा वर्षाचा संकल्प सोडला. एक वेळ जेवण जेवत. पहाटे चार वाजता उठत. पूजा पाठ साधना चालू होती. विशेष म्हणजे ते कोणती साधना करायचे, कोणते मंत्र जप करायचे, हे कोणालाही माहित नव्हते. असा हा त्यांचा प्रवास अंतिम ध्येय म्हणजे मोक्षाच्या मार्गाने चालला होता. त्यांचे राहणीमान साधे असल्यामुळे पाहणा-याला जराही कळू शकत नव्हते की, हा महायोगी आहे. सन १९९५ ला त्यांचे बारा वर्षांचे तप पूर्ण झाले होते. त्यांना सन्यास दीक्षा घेवून प्रपंच सोडून दत्ताचेच होवून जायचे होते.त्यांनी सदगुरु श्री शरदचंद्र स्वामीना पत्र लिहिले. मला दीक्षा पाहिजे. २१ वर्षांनंतर गुरु शिष्याची भेट झाली. तेव्हा सदगुरु शरदचंद्र स्वामींनी सांगितले, आता तू तर खूपच पुढे गेला आहेस. तू माझा गुरु होशील. तरीही मी मौनव्रतात आदेश मिळतो का पाहतो. त्यानंतर श्रावण महिन्यात महाराज शेवटच्या दिवशी सदगुरु श्री शरदचंद्र स्वामींच्या भेटीला गेले. तेव्हा त्यांनी सांगितले. मला तसा आदेश येत नाही. कारण तू महायोगी आहेस. तू मला गुरुस्थानी मानून सेवा केली आहेस. तेव्हा तू दोन
भगव्या लुंग्या व दोन भगव्या झोळया घेवून ये. महाराजांनी ठरलेल्या दिवशी दोन झोळया व दोन लुंग्या घेतल्या आणि भेटीला गेले. सदगुरु श्री शरदचंद्र स्वामींनी एक झोळी व एक लुंगी स्वतः महाराजांकडून घेतली. ती दत्तमहाराजांसमोर ठेवून प्रार्थनापूर्वक स्वतः धारण केली व नंतर एक झोळी आणि एक लुंगी महाराजांना दिली व म्हणाले, गुरुमंत्र तुला साक्षात दत्त महाराजांनी दिला. मी वेगळा काय देणार. मात्र तुला घरदार प्रपंच सोडता येणार नाही. तू सन्यासी आहेस. परंतु दत्तमहाराजांचा आदेश आहे, तुझी मुले स्थिर होत नाहीत तोपर्यंत घर सोडता येणार नाही. तू सन्यास व्रताने चालत रहा. महाराजांना आपला अंगठा कापून घेतल्यासारखे वाटले. पण भविष्यातील घटनाक्रम सदगुरु श्री शरदचंद्र स्वामींना दिसले होते. महाराज घरी आले. संध्याकाळ झाली होती. ते दत्त महाराजांकडे पहात होते. डोळ्यांतून गंगा ओसंडून वहात होती. महाराजांच्या तोंडून शब्द निघाले. “आता मी तुझ्या भेटीला येणार नाही. तूच माझ्या भेटीला ये”. इथूनच खरी परीक्षा चालू झाली. तेव्हापासून त्यांनी नरसोबा वाडीची वारी बंद केली. याचे कारण, महाराज दर महिन्याच्या पौर्णिमेला नरसोबा वाडीला कायम जात असत.
सदगुरु श्री रामचंद्र महाराजांच्या चार मुलांपैकी मोठा मुलगा सुरेश (दादा) यांचे लग्न झाले आणि दुसरा मुलगा संतोष म्हणजे आजचे आपले सदगुरु श्री स्वामी यांचे शिक्षण पूर्ण झाले आणि त्यांनी डिटर्जंट साबण बनवण्याचा व्यवसाय चालू केला. याच दरम्यान त्यांच्या गावातील काही लोकांनी त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. गावक-यांच्या ग ला बाधा झाली होती. एक गरीब घरातील मुलगा फॅक्टरी काढतो म्हणजे काय? त्यांनी ग्रामपंचायतीला हाताशी घेवून त्रास देण्याचा प्रयत्न केला. मात्र जिल्हा उद्योग केंद्राचे तेव्हाचे रत्नागिरीचे सुरवसे साहेब स्वामींच्या पाठीशी उभे राहिले. कोणतीही लाच न घेता सर्व कायदेशीर परवानग्या मिळवून दिल्या. नंतर गावातील काही लोकांनी बॅंकांवर दबाव आणून स्वामींचे कर्ज रोखून त्यांची आर्थिक कोंडी केली. हातात पैसा नाही. महाराजांचा मोठा मुलगा सुरेश (दादा) घर सोडून गेला. एकाच वर्षात स्वामींचे नऊ वेळा अपघात झाले. अशा परिस्थितीत फक्त कर्जाचा डोंगर उभा होता. व्यवसाय बंद पडला होता. आर्थिक घडी पूर्ण बिघडली होती. दादा पुन्हा घरी आला होता. तो रिक्षा चालवून घराचा कारभार चालवत होता. महाराजांनी, मुलांनी खूप प्रयत्न केले. परंतु कर्जाचा प्रश्न सुटेना. बँकेला सांगत होते. तुम्ही व्यवसाय ताब्यात घ्या, लिलाव करा आणि हा प्रश्न मार्गी लावा. परंतु बॅंकवालेही तसे काही करायला तयार नव्हते. एक दिवस महाराजांनी निर्वाण उपासना करायचा बुधवारी संकल्प सोडला. दत्ताने यातून मुक्त करावे, नाहीतर त्याच्या पायावर मी मुक्त होईन. त्यांनी अन्नदेवतेला नमस्कार केला. गुरुवारी पहाटे तीन पळी पाणी घेतले आणि निर्वाण उपासना चालू झाली. शुक्रवार गेला. ते कुणाशीही बोलले नाहीत. फक्त एकटक दत्त महाराजांकडे पहात बसत. जणू दत्त महाराजांबरोबर त्यांचे फार मोठे भांडण चालले होते. जेवण नाही, पाणी नाही, काहीच नाही. शनिवारी नित्य पूजा पाठ केला आणि आपल्या खुर्चीत बसले होते. एक हठ योगी दत्त महाराजांसमोर हट्ट मांडून बसला होता. संध्याकाळी चार वाजता महाराजांच्या कानावर आवाज आला. जे घडणार आहे ते बघ. तू संकल्प मागे घे. हा आदेश साक्षात दत्तात्रेयांचा होता. महाराज दत्त महाराजांसमोर बसले व संकल्प मागे घेतला आणि पुन्हा विश्वासाने सर्व सुरळीत चालू झाले.
सदगुरु श्री रामचंद्र महाराज नित्याप्रमाणे गुरुवारी पहाटे चार वाजता उठले. त्यांची नित्य पूजा क्रम चालू झाला. साडेपाच वाजता काकड आरती चालू झाली आणि अचानक महाराजांचे हात पाय गार पडून ते जमिनीवर खाली कोसळले. घरातील सर्व मंडळी धावली. महाराज पूर्ण गार पडले होते. दादा आणि स्वामींनी, महाराजांना जवळच्याच दवाखान्यात घेऊन गेले. डॉक्टरांनी तपासले व पुढे राजापूरला घेऊन जाण्यास सांगितले. महाराजांना रिक्षातून राजापूरला घेऊन जातांना दोनिवडे गावचा घाट रस्ता उतरत असतांना स्वामींनी डोळे मिटले आणि श्रीमनृसिंह सरस्वती महाराजांचे दर्शन घेतले. त्यांना प्रार्थना केली आणि आश्चर्य असे की, महाराज पूर्ण घाट रस्ता उतरायच्या आधीच खडखडीत बरे झाले होते. राजापूरला डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांनी तपासले आणि सांगितले, तुम्हाला काहीच त्रास नाही, तुम्ही घरी जाऊ शकता. ही सर्व दत्त महाराजांचीच कृपा होती.
सन २००० साली जुलै महिन्याच्या ६ तारखेला गुरुवारी आषाढ पंचमीच्या दिवशी सदगुरु श्री स्वामींनी llॐ गुरुवे नमः ll या मंत्राचा २१ हजार जपाचा संकल्प सोडला. संध्याकाळी सात वाजता त्यांचे २१ हजार जप पूर्ण झाले. त्यांच्या तोंडून मोठमोठ्याने “ॐ” काराची गर्जना चालू होती आणि त्यांना उन्मन अवस्था प्राप्त झाली होती. स्वामींचे स्वरुप पूर्ण बदलले होते. स्वामींनी उजव्या हाताने महाराजांच्या उजव्या हाताला घट्ट धरले व ते ॐकाराच्या नादात महाराजांकडे पहात होते. स्वामींनी विचारले, “मला ओळखले काय?” हा प्रश्न विचारताच महाराज म्हणाले, तुला मी ओळखणार नाही, तर दुसरा कोण ओळखणार. स्वामींनी विचारले, “बोल तुला काय पाहिजे?” हे शब्द कानावर येताच महाराज सावध झाले. क्षणात महाराजांच्या मनात विचार आला, हा आता माझा मुलगा राहिला नाही. हे वादळ उठले आहे. पुढील कार्यासाठी हा आपल्याला सोडून जाणार. त्यामुळे त्यांनी पाच वचने मागितली आणि स्वामींचा जीवन प्रवाह निश्चित केला. पहिले वचन, तुला ही भूमी सोडून जाता येणार नाही. तुझी कर्मभूमी हीच आहे आणि जिथे तू बसलायस तिथेच तुझी समाधी असावी. तुझे इथे निरंतन वास्तव्य
असले पाहिजे. दुसरे वचन, या स्थानाचे प्रति गाणगापूर झाले पाहिजे. तिसरे वचन, चमत्कारापेक्षा ज्ञानपीठ व्हावे. चौथे वचन, प्रपंचातून परमार्थ साधावा. पाचवे वचन, दत्त चरणी अष्टतिर्थाचा महिमा असावा. स्वामींनी महाराजांना वचन दिले आणि स्वामींचा प्रवास वादळाप्रमाणे चालू झाला.
सदगुरु श्री रामचंद्र महाराजांचे पहिले आणि शेवटचे शिष्य म्हणजे आपले सदगुरु श्री स्वामी. गावात गांगेश्वराचे मंदिर आहे. स्वामी त्या मंदिरात जाऊन फुले वाहून, अगरबत्ती लावून पूजा करीत असत. तिथली साफसफाई करीत असत. मात्र भावकीला ही चूक वाटू लागली. त्यांनी महाराजांना व त्यांच्या कुटुंबियांना त्रास देण्यास सुरुवात केली. स्वामी, दादा आणि महाराज यांना त्यांनी मंदिरात बोलावले. ही चूक आहे का, याबाबत गावकऱ्यांनी नऊ वेळा देवाकडे कौल लावला. पण देव नाहीच म्हणत होता. नंतर शंकर गावकार तोंडातल्या तोंडात पुटपुटला आणि गावकऱ्यांच्या मनासारखा कौल करून घेतला. मग काय ठरल्याप्रमाणे गावासमोर नाटक चालू झाले होते. महाराज म्हणाले, मी कबूल होणार नाही. मी फक्त भक्ती केली. आम्ही घाट धरतो. तर सर्वांनी विरोध केला. तेव्हा महाराजांनी सांगितले, तुम्ही जर ठरवलेच आहे, अंगाला गवत बांधून पेटवायचेच तर तुम्ही खुशाल करा. मला तुमच्याकडून न्याय घ्यायचाच नाही. त्रास देणारच तर माझ्याकडे पर्याय नाही. आता माझा न्याय हा गांगोच करेल. जोपर्यत गांगेश्वर मला न्याय देत नाही तोपर्यंत आम्ही गांगेश्वराच्या मंदिराची पायरी चढणार नाही. सर्व गाव मंदिरातून निघून गेले. स्वामी, दादा आणि महाराज यांनी गांगेश्वराला शेवटचा नमस्कार केला आणि मंदिरातून निघाले. महाराजांनी गांगेश्वराला डोळे भरून तेव्हाच शेवटचे पाहिले होते. त्यानंतर गांगेश्वराची आणि त्यांची भेट कधीच झाली नाही. ही घटना इ. स. २००१ साली घडली. भावकीतून आणि गावातून वाळीत टाकले गेले. त्यांच्या घरी कुणी आला तर त्याला दंड लावण्यात येई. महाराजांवर अनेक प्रकारे दबाव आणण्यासाठी प्रयत्न चालू झाले. परंतु कुठूनच महाराजांवर दबाव येत नाही, हे समजल्यावर गुंडगिरी करून पाहिली. पेपर, टिव्हीवर खोट्या बातम्या दिल्या. जणूकाही खूप मोठे गुन्हेगारच आहेत, अशा पद्धतीने पोलिसांकडे वरच्यावर तक्रारी केल्या गेल्या. जसे हे गावांत आतंकच माजवत आहेत. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात आल्यावर त्यांनी सुरुवातीपासून धीराने बाजू घेतली. गावांत महाराजांची पूर्वजीत विहीर होती. त्या विहीरीवर खोटे प्रकरण केले गेले. ते महाराजांनी उकरून काढले. त्यातील पुरावे ग्रामपंचायतीत, कोर्टात गहाळ करण्याचे प्रयत्न झाले. गाव रस्ते तर सोडाच, पायवाटाही बंद केल्या. ग्रामपंचायतीकडून मिळणारे पाणी सुद्धा बंद केले गेले. मठात येणा-या लोकांच्या गाड्यांची चोरी करणे, त्यांना धमकावून पाठवणे, अशा पद्धतीने छळ मांडला. महाराज यात अजिबात ढळले नाहीत. शांतपणे आपल्या भक्ती मार्गाने चालत राहिले.
सदगुरु श्री रामचंद्र महाराज यांनी सहज अनेक संस्कार घडविले. चमत्काराला नमस्कारात नेहमी त्यांना स्वार्थी भावना दिसल्या. आपल्या दिव्य ज्ञानाच्या प्राप्तीचे त्यांनी कधीच प्रदर्शन मांडले नाही आणि कधीच यावर बोलणे केले नाही. महाराज नेहमी सांगत, भक्ती नाही साधी भोळी, आहे सुळावरली पोळी. सदगुरु महाराजांनी प्रपंचातून परमार्थ साधला. भक्ती ही सर्वोत्तम साधना आहे. दत्त नामात मोक्ष आहे. याची साक्ष घालून दिली. सदगुरु श्री दत्तात्रेयांवरची असीम भक्ती आणि भक्तीची शक्ती. भक्तीतून असामान्य ज्ञानाची प्रचिती. त्यामुळे दत्त प्राप्ती होते, हे पाहण्यास मिळाले.
१५ फेब्रुवारी २०१३ रोजी वसंत पंचमीच्या दिवशी सकाळी सातच्या सुमारास सदगुरु श्री रामचंद्र महाराज शेजारीच असणाऱ्या धरणात दिडपुरुष खोल पाण्यात जावून बसले आणि जलसमाधी घेतली, इथेच त्यांचे महापर्व संपले.
त्या दिवशी ते नित्याप्रमाणे पहाटे चार वाजता उठले. एक पत्र लिहीले. त्यात त्यांनी लिहीले, “मी जलसमाधी घेत आहे.” याचे कारण होते, गावांतील काही लोक त्यांच्या पाठी स्वामींना त्रास देतील. दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत महाराजांना भक्तांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आले. नरसोबावाडीतील ब्राह्मण वृंदाने भूगर्भ समाधी सोहळा पार पाडला. हे ब्राह्मण घरी आले. त्यांनी भक्तीमय वातावरण पाहून म्हटले, आम्ही इथेच तुमच्यासोबत राहू. त्यांची रहाण्याची सोय महाराजांच्याच खोलीत केली गेली. ते रात्री जेवल्यावर झोपण्यासाठी महाराजांच्या खोलीत गेले. ते बसलेले असतांना त्यांना साक्षात महाराज त्यांच्या पलंगावर बसलेले दिसले. त्या गुरुजींनी त्यांना नमस्कार केला. महाराज त्यांना आशीर्वाद देवून गुप्त झाले. समाधीच्या बाराव्या दिवशी श्री नारायण आवाहन चालू झाले. महाराजांचा फोटो त्यांच्या साधनेच्या पाटावर ठेवला होता. जसजसे मंत्रोपचार होत होते तसतसे त्यांच्या पाटावर भस्मांकित पाय उमटले आणि पाहतात सदगुरु श्री रामचंद्र महाराज हे महायोगी असल्याची खूण अनेकांना पटली होती, जे सर्वसामान्य रहात होते.